April 27, 2024

रोहित पवार करणार राज्य सरकार भ्रष्टाचाराची पोलखोल

पुणे, २१ मार्च २०२४ : राज्य सरकारने तसेच ईडी तर्फे शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी तीव्र मोहीम सुरू केलेले असताना आता रोहित पवार यांनी देखील महायुतीच्या सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. राज्य सरकारमधील काही विभागातील भ्रष्टाचाराच्या फाईल ते पत्रकार परिषदेत उघड करणार आहेत.

केंद्रातील भाजप सरकारतर्फे इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभाग यांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवले जात आहे. मनी लॉन्ड्रीग, आर्थिक व्यवहारातील अनियमित्ता यामुळे नोटीसा पाठवून त्यांना चौकशीला बोलवले जात आहे. तासनतास बसवून ठेवले जात आहे. अशाच पद्धतीने शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना देखील चौकशीसाठी आतापर्यंत दोन वेळा बोलावलेले होते. बारामती ॲग्रो, कराड सहकारी साखर कारखाना या प्रकरणांमध्ये रोहित पवार यांना केंद्र सरकारने घेरलेले आहे. केंद्र सरकारने कितीही दबाव टाकला तरी त्यांच्या विरोधातील लढा आमचा सुरू राहील असे यापूर्वी शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील स्पष्ट केलेले आहे.

राज्यातील हा सत्ता संघर्ष सुरू असताना रोहित पवार यांनी आता त्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी केलेली आहे. रोहित पवार हे शुक्रवारी पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार मधल्या काही विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आहेत. यामध्ये रोहित पवार हे भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांपैकी कोणत्या पक्षाच्या विभागाची पोलखल करणार आहेत याकडे लक्ष लागलेले आहे.