September 10, 2024

मिनी ऑरेंज आयटीएफ स्प्रिंट राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत राहुल शिंदे व प्रग्या मोहन यांना विजेतेपद

पुणे, 16 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना यांच्या वतीने आयोजित आयटीएफ स्प्रिंट राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत पुरुष गटात एसएससीबीच्या राहुल शिंदे याने, तर महिला गटात गुजरातच्या प्रग्या मोहन यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे सुरू असलेली ही स्पर्धा वैयक्तिक स्प्रिंट प्रकारात पोहणे(750मीटर), सायकलिंग(18.6किलोमीटर) आणि धावणे(4.8किलोमीटर) मध्ये पार पडली. यामध्ये पुरुष गटात एसएससीबीच्या राहुल शिंदेने 59: 44सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. राहुल शिंदे हा पुण्यात बीईजी इंजिनिरिंग येथे प्रशिक्षक सुनील भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. चीन येथे होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर, याच गटात एसएससीबीच्या आदर्श मुरलीधरनने 01:00:09:55 मिली सेकंद वेळ नोंदवत दुसरा आणि कर्नाटकच्या यजत अय्यप्पा केपी याने 01:00:09:63 मिली सेकंद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.
महिला गटात गुजरातच्या प्रग्या मोहनने 1:09:18सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रग्या आगामी जुलै 2024मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर याच गटात महाराष्ट्राच्या मानसी मोहितेने 1:12:56सेकंद वेळ नोंदवत दुसरा आणि संजना जोशीने 1:13: 03सेकंद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंना पदके व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, मिनी ऑरेंज सिक्युरिटी सोल्यूशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिर्बन मुखर्जी, इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे डेव्हलपमेंट ऑफिसर हरीश प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे सदस्य यज्ञेश्र्वर बागराव आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मिनी ऑरेंजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिर्बन मुखर्जी म्हणाले, की आयटीएफ आणि महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना यांनी शर्यतीचे आयोजन उत्कृष्टरित्या केले होते. आम्ही पाठिंबा दिलेला हा सर्वोत्तम क्रीडा उपक्रम होता. इतकेच नव्हे तर भविष्यात आणखी काही ट्रायथलॉन स्पर्धांना प्रायोजित करण्यासाठी आम्हाला त्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. आता १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मिश्र सांघिक रीले स्पर्धेकडे आमचे लक्ष लागले आहे.
तसेच, 17ऑगस्ट रोजी मिश्र सांघिक गटात रीले(250मीटर) आणि 2.4किलोमीटर धावणे यामध्ये होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार):महिला गट:
1. प्रग्या मोहन(1:09:18सेकंद, गुजरात), 2.मानसी मोहिते(1:12:56सेकंद, महा), 3. संजना जोशी(1:13: 03सेकंद, महा)
पुरूष गट:
1. राहुल शिंदे (00:59: 44सेकंद, एसएससीबी), 2.आदर्श मुरलीधरन(01:00:09:55 मिली सेकंद, एसएससीबी), 3.यजत अय्यप्पा केपी(01:00:09:63 मिली सेकंद, कर्नाटक).