October 5, 2024

रामदास आठवलेंनीही २० जागांवर दावा ठोकला

पुणे, १० सप्टेंबर २०२४: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झालीयं. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच महायुतीचा घटक पक्ष आरपीआयनेही जागावाटपात उडी घेतलीयं. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 20 जागांची मागणी करणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय. यावेळी आठवलेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, मागील निवडणुकीत आम्ही १३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील ५ जागांवर आमचा विजय झाला होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे आम्ही २ जागांची मागणी केली, मात्र महायुतीने एकही जागा दिली नाही, शिर्डीची जागा आम्हाला मिळाली असती तर महायुतीचे माजी खासदार सुजय विखे निवडून आले असते, आता विधानसभेला आम्ही एकूण २० जागांची मागणी करणार असल्याचं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलंय.

आरपीआय पक्षाला देशात मान्यता असून आमच्या पक्षावर उमेदवार उभे करणं आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांनी आरपीआयकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आरपीआयला सन्मान देण्याची तिन्ही पक्षाची जबाबदारी आहे, ते आमचा विचार करतील अशी अपेक्षा असल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय.

ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्याच पक्षाचा आमदार :
महायुतीमध्ये सध्या भाजपच सर्वात मोठा पक्ष असून भाजपचे १०५ आमदार आहेत. तर अजित पवार गटाचे ४१ आणि शिंदे गटाचे ४० आमदार आहेत. भाजपकडे सर्वाधिक आमदार असतानाही देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना मोठ्या मनाने मुख्यमंत्री केलं आहे. आात ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा आमदार झाला पाहिजे,ज्या पक्षाच्या कमी जागा असतील त्यांचा उपमुख्यमंत्री झाला पाहिजे, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही, त्यामुळे निवडणुकीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.