October 6, 2026

साडेसहा तासांचा जल्लोष; मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीने पुणे दुमदुमले

पुणे, २५ सप्टेंबर २०२६ : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, साहसी प्रात्यक्षिके, आकर्षक रथ आणि सजावटीने सजलेली मिरवणूक… अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजता सुरुवात झाली. मानाच्या पहिल्या गणपतीच्या विसर्जनासाठी तब्बल सहा तास ५७ मिनिटे लागली. त्यानंतर मानाच्या पाचही गणपतींचे आगमन सायंकाळपर्यंत होत राहिले.

मानाचा पहिला कसबा गणपती दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी विसर्जनस्थळी पोहोचला आणि अवघ्या दोन मिनिटांत ४ वाजून ४२ मिनिटांनी त्याचे विसर्जन झाले. मिरवणूक सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झाल्याने कसबा गणपतीला विसर्जनापर्यंत पोहोचण्यासाठी सहा तास ५७ मिनिटांचा कालावधी लागला.

त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सायंकाळी पाच वाजता, तिसरा गुरुजी तालीम गणपती पाच वाजून पाच मिनिटांनी, चौथा तुळशीबाग गणपती पाच वाजून ३४ मिनिटांनी, तर पाचवा केसरीवाडा गणपती सहा वाजून ११ मिनिटांनी मिरवणुकीत दाखल झाला.

लक्ष्मी रस्त्यावर सकाळपासूनच गणेशभक्तांची गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या पथकांनी विविध ताल सादर करीत वातावरण दणाणून सोडले. ‘महाकाल २.०’, ‘अग्निपथ’, ‘शिवराज’, ‘रामलखन’, ‘धुरंधर’ आणि ‘अभेद्य ताल’ अशा नव्या तालांचा निनाद यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरला.

ज्ञान प्रबोधिनीच्या ढोल-ताशा पथकाने लक्ष्मी रस्त्यावर सहभाग घेतला. या पथकात ५७ वर्षीय वैशाली अनंतकुमार यांनी तरुण वादकांसोबत ढोलवादन करून लक्ष वेधले. तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीत हडपसरच्या विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाने सहभाग घेत मुलांसाठी खेळण्यांची गाडी आणली.

साहसी प्रात्यक्षिके, लेझीम, रथांची सजावट आणि ढोल-ताशांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे लक्ष्मी रस्ता दिवसभर गणेशभक्तीच्या उत्साहात न्हाऊन निघाला.