September 10, 2024

यंदा श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करायची कधी? १८ की १९ सप्टेंबर?

पुणे, दि. १७ ऑगस्ट, २०२३ : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पंचांग ही अमेरिकेतील नासाकडून उपलब्ध होणाऱ्या एफीमेरीजचा अर्थात माहितीचा वापर करीत तिथी काढत असल्याने अनेकदा यामध्ये गोंधळ होतो, हाच गोंधळ यावर्षीच्या गणेश चतुर्थीला झाला आहे. प्राचीन सूर्यसिद्धांताच्या पद्धतीनुसार यावर्षी १९ नव्हे तर १८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून त्याच दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांनी गणेश भक्तांना केले आहे. १९५० पासून म्हणजे मागील किमान ६० वर्षे महाराष्ट्रातील पंचांगकर्ते नासाच्या या रेडीमेड एफीमेरीजचा वापर करीत असल्याने महाराष्ट्रातील प्रमुख सणांच्या तिथी चुकून अनेकदा तारखेचा घोळ होत असल्याकडे देखील देशपांडे त्यांनी लक्ष वेधले. सुप्रसिद्ध चित्रकार शेखर साने हे देखील यावेळी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत या विषयीची अधिक माहिती देताना गौरव देशपांडे म्हणाले, “भारतात पंचांगासाठी दोन पद्धती सध्या प्रचलित आहेत. त्यातील पहिली पद्धत ही प्राचीन पद्धत असून तिला सूर्यसिद्धांत पद्धती असे म्हटले जाते. तर १९५० पासून नासाकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीवर तयार होणाऱ्या पंचांगाला नासाच्या एफीमेरीजवर आधारित पद्धती म्हणून ओळखले जाते. सूर्यसिद्धांत पद्धती ही ‘सूर्यसिद्धांत’ या ग्रंथावर आधारली असून हा एक प्राचीन खगोलशास्त्रीय समीकरणे असलेला ग्रंथ आहे. सूर्याने मय राक्षसाला केलेला उपदेश म्हणजे हा ग्रंथ असे मानले जाते. या ग्रंथाचा काळ हा सतयुग असा सांगितला जातो.”

सूर्यसिद्धांत पद्धतीनुसार ग्रंथात दिलेल्या गणिती समीकरणांच्या माध्यमातून सूर्योदय, सूर्यास्त, ग्रहणे यांच्या वेळा, तिथी आदी गोष्टी पंचांगात मांडल्या जातात. १९५० च्या सुमारास नासाच्या वतीने खगोलशास्त्रीय माहिती प्रसिद्ध होऊ लागल्याने या उपलब्ध माहितीच्या आधारावर पंचांगकर्ते तिथी, वेळ काढू लागले. त्यातही नासाकडून आलेली माहिती किंवा परदेशातील माहिती ही योग्यच असणार अशा विचारांच्या पगडा असल्याने सोप्या पद्धतीने उपलब्ध झालेल्या माहितीने आकडेमोड व ज्ञानाच्या वापरावर मर्यादा आल्या, आणि महाराष्ट्रात ही पद्धत रूढ झाली. मात्र, या पद्धतीचा आधार चुकीचा असल्याने महाराष्ट्रात अनेक सणवार काही वेळेस चुकीच्या दिवशी साजरे होत असल्याचे देशपांडे म्हणाले.

कोणतेही पंचांग मांडताना त्यामध्ये गणितीय समीकरणे असल्याने वेळेसोबत गणित व खगोलशास्त्राचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. आज महाराष्ट्रात निघत असलेली पंचांग या बाबींचा फारसा विचार न करता उपलब्ध माहितीच्या आधारावर तिथी काढत असल्याने हा घोळ होत आहे असे सांगत देशपांडे पुढे म्हणाले की, “शृंगेरी शंकराचार्य पिठाचे पंचांग, १५० वर्षे जुने असलेले मदन मोहन मालवीय पुरस्कृत व बनारस हिंदू विद्यालय यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात येणारे विश्व पंचांग आणि वैष्णवांचे मंत्रालय, उत्तराधी मठ, कर्नाटक आदी प्रमुख पंचांग पाहिली तर गणेश चतुर्थी ही १८ सप्टेंबर रोजी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मग केवळ महाराष्ट्रातच काही पंचांगकर्ते हे १९ सप्टेंबर ही तारीख का देत आहेत? धर्माचार ही सामान्य नागरिकांसाठी एक महत्वाची भावनिक बाब असताना असा घोळ होत असेल तर याचे स्पष्टीकरण दिले जावे असे मला वाटते.”

पंचांग हे शास्त्रशुद्ध गणित आहे. आपल्याकडे सणवार तिथीवरून सांगितले जातात, तारखेवरून नाही. सूर्यसिद्धांत पंचांगावरून एखादी तिथी ही कमीत की २१ तास २४ मिनिटे कमी होऊ शकते किंवा २६ तासांपर्यंत वाढू शकते. तिथीचे हेच समीकरण नासाच्या माहितीचा आधार घेतल्यास जास्तीत जास्त २७ तास तर कमीत कमी १९ तास ३० मिनिटे आहे. तिथी किती वाढते आणि किती कमी होते यावर तो दिवस ठरतो. सूर्यसिद्धांत ग्रंथात तिथीची सर्व समीकरणे दिली असताना धर्मशास्त्राप्रमाणे आणि ऋषींच्या वचनांप्रमाणे ती का मांडली जात नाहीत, असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला.

ऋषींची वचने ही त्रिकालबाधित सत्य सांगितली असताना आपले चुकलेले गणित बदलायाचे की परंपरेने चालत आलेले शास्त्र बदलायचे याचा विचार आता तरी व्हायला हवा. धर्म- कर्म ही लोकांच्या श्रद्धेचा विषय असून चुकीच्या वेळी चुकीचे कर्म झाले तर अघटीत घडते असे आपण मानतो, या परिस्थितीत श्रींची प्राणप्रतिष्ठा नेमकी कधी करायची याबद्दल चर्चा व्हायला हवी याकडे देशपांडे यांनी लक्ष वेधले.

गौरव देशपांडे हे महाराष्ट्रात गेली १३ वर्षे सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग प्रकाशित करीत आहेत. १४ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर अजूनही आपला आयटी व्यवसाय सांभाळून ते पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यात उल्लेखनीय काम करत आहे. बंगळुरू येथील कुडली श्रृंगेरी पीठातर्फे त्यांना ज्योतिर्विद्या वाचस्पती ही उपाधी प्रदान करण्यात आली असून कुडली श्रृंगेरी पीठाचे अकरावे शंकराचार्य मठाधिपती श्रीश्री विद्याविद्येश्वर भारती यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. देशपांडे यांच्या भारतीय खगोलशास्रावर आधारित पंचांग अभ्यासाची दखल घेत सदर सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे.