June 22, 2025

१९४४ च्या डॉकयार्ड अग्निकांडातील शहीद जवानांना श्रद्धांजली; राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहास प्रारंभ

मुंबई, १४ एप्रिल २०२५: राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सोमवार (१४ एप्रिल) रोजी मुंबईतील अग्निशमन मुख्यालयात १९४४ साली डॉकयार्ड येथे झालेल्या भीषण स्फोट व आगीत शहीद झालेल्या ६६ अग्निशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईतील डॉकयार्ड येथे स्फोटक पदार्थांनी भरलेल्या जहाजाला लागलेल्या आगीत ६६ जवानांनी आपले प्राण गमावले होते. या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत देशभरात “राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह” जनजागृतीपर कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो.

या सप्ताहात विविध शहरांमध्ये आग लागल्यास कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व, आणि अग्निशमन दलाचे योगदान या विषयांवर जनजागृती केली जाते.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये आग व इतर आपत्तींविषयी सजगता निर्माण करणे, तसेच अग्निशमन दलाच्या शौर्याचा गौरव करणे हे आहे.

मुंबई अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जवानांनी यावेळी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.