October 5, 2024

सीओईपी टेक सारखी विद्यापिठे नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करीत बदल आणि विकासाचे प्रतिनिधित्व करतील – राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

पुणे दि. २८ ऑगस्ट, २०२४: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत संशोधनात्मक शिक्षणावर दिलेला भर, आंतरविद्याशाखीय शिक्षणाचे जाणलेले महत्त्व आणि उद्योग संस्थांसोबत वेळोवेळी केलेली भागीदारी या बाबींमुळे सीओईपी टेक सारखी विद्यापीठे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब करीत आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकण्यास मदत करतील शिवाय बदलत्या भारताचे आणि भारताच्या विकासाचे प्रतिनिधित्व देखील करतील असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले. पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सुनिल भिरुड, कुलसचिव डॉ दयाराम सोनावणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ यशोधरा हरीभक्त आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाच्या सर्व शाखांच्या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटेशनल सायन्सेस, इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन्स इंजिनीअरिंग, स्कूल ऑफ मेकॅनिकल अँड मटेरियल इंजिनीअरिंग आणि ट्रान्सडिसिप्लिनरी सायन्सेस आणि मॅनेजमेंटच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, “आज जग वेगाने बदलत आहे. तुम्ही एकच अभ्यासक्रम सलग २०-३० वर्षे शिकवू शकत नाही. हेच लक्षात घेत प्रत्येक क्षेत्राची, मार्केटची नेमकी गरज ओळखून आपल्या पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आंतरशाखीय अभ्यासक्रमाला महत्त्व देत नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली आहे. सीओईपी टेक विद्यापीठ याच मार्गावर योग्य पद्धतीने पुढे जात असून सीओईपी सारख्या विद्यापिठांच्या मदतीने आपण ज्ञान आणि कौशल्याधारित आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू.” हे करीत असताना युवा पिढीचे सक्षमीकरण होईल असा विश्वास देखील राज्यपालांनी व्यक्त केला.

आज आपल्या समाजाचा महत्त्वाचा भाग असलेल्या आदिवासींना आधुनिक शिक्षण, आधुनिक जगाची ओळख आपल्याला करून द्यावी लागणार आहे. त्यांना इतर सर्वांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने आपण तयार करायला हवे आहे, असेही राज्यपाल म्हणाले. संपूर्ण आर्थिक विकास गरजेचा आहेच मात्र मायक्रो अर्थव्यवस्थेतील वाढ अपेक्षित असल्यास आर्थिक विकास हा सर्वसमावेशक असायला हवा असेही त्यांनी नमूद केले.

दररोज विद्यार्थी लॅपटॉपवर अनेक तास अभ्यास करतात परंतु ते काही काळ बाजूला ठेवत स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी व नवीन ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज एक तास छापील पुस्तक वाचण्यासाठी वेळ द्यावा, असा सल्ला देखील राज्यपाल महोदयांनी दिला. आज जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारताचा विचार करीत आहे ही सकारात्मक बाब आहे याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.

सीओईपी टेकने जागतिक दर्जाची संस्था म्हणून आपले स्थान सुधारण्यासाठी केपीएमजी सारख्या व्यवस्थापन संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. पुण्यातील अभियांत्रिकीचा विचार करताना इतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्येही सीओईपी टेक विद्यापीठाला सर्वोच्च प्राधान्य दिल्या जाते ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे डॉ प्रमोद चौधरी म्हणाले. जे आज उत्तीर्ण होत आहेत त्यांनी त्यांच्या भावी प्रवासात विद्यापीठाचा समृद्ध वारसा आणि मूल्ये कायम लक्षात ठेवावीत अशी अपेक्षा डॉ चौधरी यांनी व्यक्त केली.

प्रा भिरूड यांनी यावेळी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला. एनआयआरएफ रँकिंगमध्ये सीओईपी टेक विद्यापीठ हे राज्यातील विद्यापीठांमध्ये ३३ व्या तर अभियांत्रिकी विद्यापिठांमध्ये ७७ व्या स्थानावर असून विद्यापीठात सध्या ४६०० विद्यार्थी शिकत आहेत. विद्यापीठाद्वारे २८ पदव्युत्तर, १० पदवी तर २ व्यवस्थापन अभ्यासक्रम चालविले जातात अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना प्र भिरूड म्हणाले, “विद्यापीठाचे नवीन ग्रंथालय व प्रशासनाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थी कल्याण मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना १०५ लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. ३३० विद्यार्थ्यांना तब्बल १.४ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या वर्षी सुमारे २४० कंपन्या कॅम्पस भरतीसाठी विद्यापीठात आल्या. यामध्ये सुमारे ७९% पदवीधर विद्यार्थी आणि ४७% पदव्युत्तर अभ्यासाक्रामचे विद्यार्थी यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळाले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले सर्वाधिक पॅकेज हे ८७/- लाख रुपयांचे होते तर सरासरी पॅकेज हे रु.१२ लाख इतके होते.”

सीओईपी टेक विद्यापीठाने यावर्षी कार्यरत व्यावसायिकांसाठी पदवी स्तरावर ३ अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर स्तरावर २ नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मातृभाषेतून तंत्रशिक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या मोहिमेतील एक भाग म्हणून विद्यापीठातर्फे ६ पाठ्यपुस्तकांचे मराठीत अनुवाद करण्यात आले असून ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात आहेत. विद्यापीठाला यावर्षी २४ पेटंट मिळाले असून त्यापैकी १० पेटंट हे वैद्यकीय उपकरणांसाठी आहेत, अशी माहिती देखील प्रा भिरूड यांनी दिली.

विद्यापीठाच्या मानदंडासोबत काढलेल्या शोभायात्रेने मान्यवरांचे सभागृहात आगमन झाले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि सीओईपी टेक गीत याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ क्षिप्रा मोघे आणि नंदिनी अय्यर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.