April 29, 2024

आपला पुणे सायक्लोथॉन स्पर्धेत 6000स्पर्धकांचा सहभाग

पुणे, 14 मार्च 2024: पुनीत बालन ग्रुप प्रायोजित आणि फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग यांनी प्रायोजित केलेल्या आपला पुणे सायक्लोथॉन या स्पर्धेची तिसरी आवृत्ती येत्या रविवार, 17 मार्च 2024रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडणार असून 6000हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. 
 
स्पर्धेचे संचालक कृष्ण प्रकाश (आयपीएस) यांनी सांगितले की, व्यावसायिक आणि हौशी अशा दोन गटात पार पडणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, पीसीपीसी, पुणे पोलिस, पीएमसी, पीसीएमसी, सदर्न कमांड, एनडीआरएफ, इंडीयन नेव्ही, बॉम्बे सॅपर्स, एएफएमसी, क्रोटरी पुणे डिस्ट्रिक्ट, तसेच अनेक कॉर्पोरेट संघांनी भाग घेतला आहे. 
 
कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले की, पुणे व महाराष्ट्रातील सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून खळखळता उत्साह आणि रोमांच यांनी रसरसलेला उत्साहवर्धक दिवस अनुभवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळात ही स्पर्धा पार पडणार आहे. 
 
कृष्ण प्रकाश म्हणाले की, विकसित देश बनण्याकडे आपली वाटचाल सुरू असताना दैनंदिन वाहतुकीसाठी सायकल हेच प्रमुख वाहन असणे आवश्यक आहे. जगभरातील विकसित देशांमध्ये महागड्या मोटारी व दुचाकी वाहने असूनही अधिकाधिक नागरिक रोजच्या प्रवासासाठी सायकललाच प्राधान्य देतात. 
 
सायक्लोथॉनचे मुख्य संयोजक रविंद्र वाणी म्हणाले की, आपला पुणे सायक्लोथॉनसाठी 10 लाख रुपयांची रोख पारितोषिके तसेच, प्रायोजकांतर्फे खास भेटवस्तू व गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार असून त्यामुळे सायकलिंग संस्कृतीला असलेला पाठिंबा दिसून येतो. 
 
आपला पुणे  सायक्लोथॉन स्पर्धा एलिट गट,  हौशी या दोन गटात पार पडणार आहे. महाराष्ट्र सायकलिंग संघटना आणि भारतीय सायकलिंग महासंघ यांच्या पाठिंब्याने आयोजित या एलिट गटात पुरुषांसाठी 60 किलोमीटर, महिलांसाठी 30किलोमीटर आणि महिलांसाठी मास्टर एलिट या प्रकारात होणार आहेत. हौशी गटात 10किलोमीटर जॉय राईड, यांबरोबरच 25किमी,50किमी, 100किलोमीटरच्या शर्यती असणार आहेत. 
 
योग्य वेळ नोंदवण्यासाठी चीप तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पुणे आणि पीसीएमसीमधील बाणेर, हायस्ट्रीट, ज्युपिटर हॉस्पिटल, औंध आणि अशाच निसर्गरम्य परिसरातून शर्यतीचा मार्गक्रमन असणार आहे. त्यामुळे केवळ स्पर्धकांनाच नव्हे तर शहरांतील सायकल प्रेमींना शर्यतीचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
मुख्य प्रायोजक पुनीत बालन म्हणाले की, या स्पर्धेशी जोडला गेल्याबद्दल मला आनंद आणि अभिमान वाटत असून पुण्याला पुन्हा एकदा सायकलिंगचे शहर बनवण्यासाठी व सायकलिंग लोकप्रियता वाढवण्याचे लक्ष ठेवून आम्ही या स्पर्धेला पाठिंबा देत आहोत. 
 
फिनोलेक्सचे व्यवस्थापकीय संचालक अजित वेंकटरमण म्हणाले की, आपला पुणे सायक्लोथॉन ही केवळ एक शर्यत नसून एका आरोग्यपूर्ण निसर्गाशी जोडले जाणाऱ्या आणि निरोगी भविष्यकाळाकडे वाटचाल करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे. किंबहुना आपलं भविष्यकाळ बदलून टाकण्यासाठी प्रत्येकाने या शर्यतीत सहभागी झाले पाहिजे.