October 6, 2026

पुणे-ओकायामा मैत्रीला नवी भरारी

पुणे, २९ सप्टेंबर २०२६ : पुणे आणि जपानमधील ओकायामा शहरांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी ओकायामा प्रीफेक्चरचे राज्यपाल रुयता इबालागी यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी दोन्ही शहरांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

भारत आणि जपानमधील संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या नव्या उंचीवर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात जपानी उद्योग, तंत्रज्ञान आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे, असे नागपुरे यांनी सांगितले.

पुणे हे वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे ओकायामा येथील उद्योजक आणि कंपन्यांनी पुण्यात गुंतवणूक करावी तसेच प्रादेशिक कार्यालये सुरू करावीत, असे आवाहन नागपुरे यांनी केले. आयुर्वेद, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, योग आणि आरोग्यविषयक उपक्रम या क्षेत्रांत जपानी कंपन्यांनी पुण्यात गुंतवणूक करावी आणि संयुक्त संशोधन सुरू करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुणे शहरात जपानी कंपन्यांची जागतिक सेवा केंद्रे अधिक प्रमाणात सुरू व्हावीत, यासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात येणाऱ्या जपानी उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि सहकार्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

भगिनी शहर कराराचे नूतनीकरण

पुणे-ओकायामा मैत्रीचे २० वर्षे पूर्ण होत असल्याने ओकायामाचे राज्यपाल आणि त्यांच्या औद्योगिक व प्रशासकीय शिष्टमंडळाला नोव्हेंबरमध्ये पुणे भेटीचे निमंत्रण देण्यात आले. या भेटीदरम्यान गेल्या दोन दशकांतील मैत्रीचा गौरव करत दोन्ही शहरांमधील भगिनी शहर कराराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

पुण्यात संयुक्त कौशल्य विकास आणि भाषा केंद्र सुरू करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला. या केंद्रातून तरुणांना जपानी भाषा, कामाची संस्कृती आणि तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देता येईल. त्यामुळे जपानी कंपन्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.

पुण्यात जपानी संस्कृतीचे प्रतीक म्हणून पु. ल. देशपांडे उद्यान उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर ओकायामा शहरात पुण्याच्या संस्कृतीचे आणि मराठा स्थापत्यकलेच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असणारे स्मारक किंवा सांस्कृतिक जागा उभारावी, अशी विनंती नागपुरे यांनी केली.

ओकायामाच्या प्रशासनाने आणि राज्यपालांनी या आर्थिक व सांस्कृतिक प्रस्तावांचे सकारात्मक स्वागत केले. त्यामुळे दोन्ही शहरांमधील सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पीएमपीएमएलचे अध्यक्ष अजय खेडेकर तसेच ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान’चे समीर खळे उपस्थित होते.