March 24, 2025

‘विधिमंडळात तळागाळातील जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंब हवे’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, ८ फेब्रुवारी २०२५: ‘जनसंपर्कासह विधिमंडळ कामकाजातून लोकप्रतिनिधींचे मूल्यवर्धन होते. विधिमंडळात कायदे करताना त्यामध्ये तळागाळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत, तसेच जनतेशी संवाद आणि विधिमंडळाचे कामकाज यामध्ये संतुलन ठेवले पाहिजे,’ असे मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी देशभरातील सर्वपक्षीय आमदारांना केले.

‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’तर्फे देशभरातील आमदारांसाठी दोन दिवसीय- क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या संमेलनात देशभरातून आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या २०० पेक्षा अधिक आमदारांनी सहभाग घेतला आहे .

याप्रसंगी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ.सी.पी जोशी, एनएलसी भारतचे संस्थापक-संयोजक डॉ.राहुल कराड, प्रा.परिमल माया सुधाकर, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आदी उपस्थित होते.केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संमेलनात ऑनलाइन मार्गदर्शन केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अंगभूत नेतृत्वगुणातून लोकप्रतिनिधी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवतात. मात्र, निवडणूक झाल्यानंतर वाहावत जातात. त्यामुळे जनतेचे कल्याण या उद्देशाने कार्यरत राहिले पाहिजे. लोकांमध्ये असताना विधिमंडळ आणि विधिमंडळात असताना मतदारसंघाचा विचार केला पाहिजे. त्यातून लोकप्रतिनिधींचे मूल्यवर्धन होईल. लोकप्रतिनिधींनी घटनात्मक कर्तव्याला अनुरूप काम केले पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने आत्मसात केले पाहिजे. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीकाही सहन केली पाहिजे.

नितीन गडकरी म्हणाले, ‘ देशात परिवर्तनासाठी लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे. त्यासाठी हे संमेलन अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही म्हणजे केवळ सत्ताकारण नाही, ते राजकारण, समाजकारण आणि विकासकारण आहे. राजकारणातून सामाजिक व आर्थिक सुधारणा होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जनतेचा सुखांक (हॅपिनेस इंडेक्स) वाढविण्यावर भर द्यावा. मतदारसंघात संरचनात्मक, समाजोपयोगी आणि शाश्वत विकासाचे कार्यक्रम राबविले पाहिजेत. जनतेच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. घटनात्मक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. या गुणात्मक परिवर्तनानेच लोकशाही सक्षम होऊन राष्ट्र प्रगतीपथावर जाईल.’

सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम केले पाहिजे. भारतीय ही भावना मनात ठेवून विकासाचा एकत्रित विचार केला पाहिजे. सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी जनतेपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राजकारणात चांगली लोक आणि सक्षम विरोधी पक्ष असल्यास लोकप्रतिनिधींचे काम सुधारेल. चांगला लोकप्रतिनिधी कसा असावा, जनतेचे भले कसे व्हावे, यासाठी अशा प्रकारची संमेलने आवश्यक असून, त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.’

राम शिंदे यांनी ‘मतदारसंघातील लोकांच्या आकांक्षांची पूर्तता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘लोकप्रतिनिधींमध्ये संवाद व अनुभवसंपन्न विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्वाचे आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

सतीश महाना म्हणाले, ‘लोकप्रतिनिधींनी लोकशाही संस्थांची प्रतिमा जपण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी मतदारसंघाच्या पलीकडे शहर, राज्य आणि देशाचा विचार केला पाहिजे. घटनात्मक अधिकारांबाबत सजग असले पाहिजे. सर्व लोकप्रतिनिधींचा सन्मान करत लोककल्याणासाठी काम केल्यास लोकशाहीत लोकसहभाग वाढेल.’

डॉ. राहुल कराड म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रथमच पक्ष-विचारधारेच्या पलीकडे जात सर्व विधानसभा, विधानपरिषदांचे आमदार या संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत. सनातन परंपरा हा सर्वांना जोडणारा दुवा असून, आमदारांमध्ये संवाद निर्माण व्हावा, चांगल्या धोरणांचे व कल्याणकारी योजनांचे आदान प्रदान व्हावे, त्यातून विकासाचे राजकारण व्हावे, या उद्देशाने हे संमेलन होत आहे.’
देवेंद्र फडणवीस, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी. जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.