June 22, 2025

Pune: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणाऱ्या शिवसृष्टीला लहान थोरांचा मोठा प्रतिसाद

पुणे, दि. २१ मे, २०२५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारी, २१ व्या शतकात आपल्या समोर शिवकाळ उभा करणारी आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी सध्या भेट देण्यास येणाऱ्या नागरीकांनी जणू फुलली आहे. इतिहासाचे वैभव दाखविणाऱ्या वास्तू, विविध प्रकारे कथा, गोष्टी, चित्रे, संग्रहालयातील वस्तू यांमुळे समोर येणारा शिवकाळ यामुळे येथे येणारा प्रत्येक जण जणू भारावून जाताना पहायला मिळत आहे.

आशिया खंडातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये अवतरलेला ‘शिवकाळ’ अनुभविण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी शिवप्रेमींकडून केवळ नाममात्र ५० रुपये प्रवेशशुल्क आकारले जात आहे. १५ जुलै पर्यंत ही योजना लागू करण्यात आली असून पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने शिवसृष्टीला देण्यात आलेल्या ५१ लाख रुपयांच्या देणगीद्वारे हे शक्य झाल्याचे शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.

सदर योजना सुरु झाल्यानंतर मागील तीन दिवसात शिवसृष्टीला सात हजारांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिली असल्याचे सांगत अनिल पवार पुढे म्हणाले, “उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असल्याने वातानुकुलीन अशा शिवसृष्टीत लहान थोरांना शिवकाळाचा अनुभव घेता येणार आहे. महाराजांचा इतिहास,

त्यांचा संघर्ष, त्यांनी पाहिलेली स्वराज्याची स्वप्ने, त्यांची राज्यपद्धती, यांची दूरदृष्टी यांबद्दल येणाऱ्या पिढ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म या विचारांचा प्रचार व प्रसार सर्वत्र झाला पाहिजे या प्रामाणिक हेतूने पुण्याजवळील आंबेगाव, ब्रुद्रुक, पुणे ४११ ०४६ येथे तब्बल २१ एकर परिसरात उभारलेली शिवसृष्टी यानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल असा आम्हाला विश्वास आहे.”

सध्या सुरु असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये यानिमित्ताने आपापल्या कुटुंबातील लहाने मुले व तरुणांना नागरिकांनी शिवसृष्टी दाखविण्यास घेऊन यावे असे आवाहन आम्ही करीत आहोत. आपल्या द्रष्ट्या व जाणता राजाचे व्यक्तिमत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी, आपल्या इतिहासासोबतच नीतीमूल्ये आणि कर्तव्यांची जाणीव नव्या पिढीला होण्यासाठी आणि पर्यायाने एक सशक्त समाज तयार होण्यास याद्वारे मदत होईल असे आम्हाला वाटते, असेही पवार म्हणाले.

नुकतेच फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीचे औचित्य साधत शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या टप्प्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे विशेष असे टाईम मशीन थिएटर. हे थिएटर शिवप्रेमींसाठी एक पर्वणी ठरत असून यामधील कालकुपीत बसून आपण सुमारे काही हजार वर्षे मागे जातो व तेथून शिवाजी महाराजांचा काळ दृक श्राव्य पद्धतीने अनुभवितो. यामध्ये महाराजांशी संबंधित कथा या आधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यमातून शिवप्रेमींना अनुभवता येतात. यासाठी मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारा रंगमंच यांचा प्रामुख्याने अनुभव घेता
येणार असून या कालकुपीच्या थिएटरमध्ये एका वेळी १०० व्यक्ती विशेष अशा ३६ मिनिटांच्या शोचा अनुभव घेऊ शकतात.

याशिवाय शिवसृष्टीमधील दुर्गवैभव’, ‘रणांगण’ ही दालने, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे ‘श्रीमंत योगी’ हे दालन,राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन, महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या महाराजांच्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्स, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या लढायांची माहिती देणारे दालन, प्रतापगडावर असलेल्या तुळजा भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती आणि गंगासागर तलाव आदींना भेट देत शिवकाळाचा प्रत्यक्ष अनुभवच शिवप्रेमींना घेता येणार आहे.