October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: ‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर !

पुणे, ०३/०८/२०२३: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीचे महत्वाकांक्षी अभियान असलेल्या ‘महाविजय २०२४’ साठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद देत त्या अंतर्गत येणाऱ्या कोथरुड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघाचे ‘महाविजय २०२४’चे समन्वयकपद म्हणूनही मोहोळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणूनही मोहोळ हेच काम पाहणार आहेत.

नव्या जबाबदाऱ्यांबद्दल मोहोळ म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या आपण पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेतून पार पाडणार आहोत. संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनासोबत घेऊन ‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी निश्चितपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न असेल. विश्वासाने या जबाबदाऱ्या सोपविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनापासून धन्यवाद पक्ष श्रेष्ठींचा विश्वास निश्चितपणे आपण सार्थ करून दाखवू’.

राज्यातील प्रत्येक घरावर तिरंगा दिसेल : मोहोळ

स्वातंत्र्य दिनी केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत असून शासकीय पातळीबरोबर पार्टीच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या वर्षी या अभियानाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. यंदाही या अभियानाबाबत जनजागृती करुन राज्यातील प्रत्येक घरावर तिरंगा दिसेल, यासाठी आमचे सामूहिक प्रयत्न असणार आहेत.