December 2, 2023
Shashikant Wakade appointed as President of Maharashtra Solar Manufacturers Association (MASMA)

महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या (मास्मा) अध्यक्षपदी शशिकांत वाकडे यांची नियुक्ती

पुणे: महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन(मास्मा)ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात पार पडली. यावेळी महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशिकांत वाकडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारणीमध्ये सामाजिक सचिवपदी मयूर पांडे, खजिनदारपदी गौरव महाजन, संचालकपदी नितीन कुलकर्णी, विशाल कुंभारदरे, प्रतीक पोखरकर यांची नियुक्ती झाली. तसेच जिल्हा संचालक म्हणून आशिष मूळे, भरतेश धूली, राजेंद्र पांचाल, सहज मुथा, प्रदिप खाडे, विनोद सूर्यवंशी, प्रदिप बोधले, अरूण शिंघवी, अभिजित विचारे, अतुल होनोले, मनिषा बारबिंड, वैभवी कोप यांची नियुक्ती झाली.

 

यावेळी माजी अध्यक्ष रोहन उपासनी, राजेश मुथा, समीर गांधी, सुशिल पुंगलिया, सुहास घोटीकर, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, नरेंद्र पवार, जयेश अकोले उपस्थित होते. रोहन उपासनी यांनी यावेळी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा सादर केला.

 

शशिकांत वाकडे म्हणाले की, “ओन्ली बिझनेस नथिंग एल्स” म्हणजे व्यवसायाव्यतिरिक्त काही नाही हे ब्रीद वाक्य संपूर्ण यशस्वी करण्याचे नवीन कार्यकारणीचे उदिष्ट आहे. तसेच “मास्मा है तो विश्वास है” हा भाव सर्व स्तरामध्ये पोहचवायचा आहे. रूफटॉप सोलर व्यतिरिक्त सोलर वॉटर हिटर्स, सोलर पंप्स अशा इतर संधीचाही फायदा सभासदांना कसा होईल? हे पाहणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त सोलर व्यवसाय वाढविण्यासाठी लागणाऱ्या धोरणांमध्ये कसे बदल करता येतील?, महावितरणमध्ये सर्वात जास्त काम असल्याने तेथील प्रक्रिया कशी सुलभ करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी “सोलार टेंडर सेल” या संकल्पनेवर अधिक काम करण्याचा मानस आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काम करतानाची “सुरक्षा ” यावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शासनातर्फे अनेक निविदा निघतात आणि त्याची माहिती सर्वसामान्य सभासदांना नसते, त्यामुळे त्यांचा सहभाग कमी असतो. या टेंडर सेल मार्फत संपूर्ण प्रक्रिया ही योग्य पद्धतीने होणार आहे. कुशल मनुष्यबळ असलं की वेळेची आणि पैश्यांची बचत होऊ शकते आणि कामे वेळेत होऊ शकतात. त्यामुळे “सूर्य मित्र” संकल्पनेला अधिक प्राधान्याने राबविण्यात येणार असून त्याद्वारे बेरोजगारीवर मात करता येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन एक वर्षाची कार्यशाळा घ्यायची आमची योजना आहे. जेणेकरुन बेरोजगारी कमी होऊन कुशल मनुष्यबळ वाढीस मदत होईल.