October 5, 2024

पुण्यात महायुतीत बिघाडी? अजित पवारांच्या मतदारसंघावर शिवसेनेने ठोकला दावा

पुणे, २३ सप्टेंबर २०२४ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही गोटात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यातच अनेक इच्छुकांनी आपल्यालाच उणेदवारी मिळणार, असा विश्वास व्यक्त करत तयारी सुरू केली. दरम्यान, हडपसर मतदारसंघात सध्या महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करत आहे. अशातच आता शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी एक भावनिक पत्रक व्हायरल करून आपल्या उमेदवारीची सुप्त इच्छा जागृत केली.

या पत्रात भानगिरे यांनी मतदारांना उद्देशून म्हटले आहे की, आपल्या प्रेमरुपी आशीर्वादाने मी गेली 20 वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रियपणे कार्यरत आहे. आतापर्यंत झालेल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतांना मनात समाधानाची व कृतज्ञतेची भावना आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, फक्त आणि फक्त आपल्या प्रेमामुळं आणि कुटुंबातील समाजकारणाच्या शिकवणीमुळं मी मतदारसंघात राजकारण आणि समाजकारणाचा पिंड जोपासू शकलो.

त्यांनी पुढं लिहिलं की,राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात 300 कोटी रुपयांची विकासकामे आणली. मतदारसंघात स्व.बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, विरंगुळा केंद्र, भाजी मंडई, नागरिकांना मोफत सेवा देणाऱ्या दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालयाची निर्मिती करून विकासाचे नवे केंद्र हडपसरमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मतदारसंघात गाजलेली मुख्यमंत्री बैलगाडी शर्यत, राज्यस्तरीय सेनाकेसरी स्पर्धा, भारतातील सर्वात पहिले प्रभू श्रीरामांचे पूर्णावकृती शिल्प उभारत सर्व सार्वजनिक उत्सवाबरोबरच पुणे शहरातील सर्वात मोठी धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी गेली अनेक वर्ष आयोजित करत आलो. मतदारसंघातील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी जोडण्याचा प्रयत्न करत आलो. लवकरच विधानसभा निवडणुका येत आहे. हडपसरचा पूर्णत्वाने बदलायला हवे, या ध्येयाने झपाटून काम करत आहे. आजही मतदारसंघातील प्रत्येक विकासकामांसाठी आग्रही आहे. हडपसर मधील असंख्य सोसायट्यांचा चेहरामोहरा मला बदलायचा आहे. तुमच्या या नानाला मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्यासाठी आपल्य़ा आशीर्वादीची गरज आहे, असं भानगिरे म्हणाले.

दरम्यान, भानगिरे यांचे हे पत्र सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांनी केलेल्या उमेदवारीच्या दाव्यामुळे हडपसर मध्ये मतदारसंघात वेगळे ट्विस्ट निर्माण झाले आहे. महायुतीतील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्याने सुखावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भानगिरे यांच्या या पत्राने खळबळ उडवून दिली आहे. महायुतीत निर्माण झालेली ही स्पर्धा भविष्यात कोणत्या वळणावर थांबेल याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.