October 5, 2024

तरूणांनी जर्मनीतील नोकरीसाठी व जर्मन भाषेच्या शिक्षकांनी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, 22 ऑगस्ट 2024: जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे. कुशल तरूणांनी जर्मनीत नोकरीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधील जर्मन भाषा शिकवण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने केले आहे.

बाडेन वुटेनबर्ग राज्यास आरोग्य क्षेत्रासह परिवहन व विविध उद्योगातील तंत्रज्ञांचा पुरवठा करण्यात येणार आहे. पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ तातडीने या राज्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य व्यावसायिक, आदरातिथ्य व इतर क्षेत्रातील एकूण ३० ट्रेड, अभ्यासक्रमांची निश्चिती करण्यात आलेली आहे. सदर अभ्यासक्रम पूर्ण झालेले विद्यार्थी https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करू शकतात.

जर्मन भाषा शिकवण्यासाठी गोएथे इन्स्टिट्यूट, मॅक्समुलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या व पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जर्मन भाषा शिकवणीचे ५ वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत. जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक आवश्यक आहेत.

एखाद्या ट्रेडच्या संदर्भात बाडेन बुटेनबर्ग राज्याचा अभ्यासक्रम व महाराष्ट्राचा अभ्यासक्रम यामध्ये तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी तसेच गरज पडल्यास क्षेत्रनिहाय कौशल्य वृद्धीसाठी या मुलांना अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर यांनी कळविले आहे.