पुणे, दि. २३ सप्टेंबर, २०२४: राज्याची राजधानी नसताना देखील मागील तीन वर्षांपासून देशात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत व राहण्यायोग्य शहरांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या पुणे शहराने २०२४ च्या पहिल्या सहामाही (जानेवारी- जून २०२४) मध्ये वेअर हाऊसिंग आणि कार्यालयीन जागांची विक्री यामध्ये गाठलेला टप्पा बांधकाम व्यवसाय क्षेत्रात एक मैलाचा दगड असून यामुळे नजीकच्या भविष्यात घरांच्या विक्रीसोबतच शहरात नोकऱ्यांच्या संधी देखील वाढतील अशी निरीक्षणे ‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट सप्टेंबर २०२४’ या अहवालात समोर आली आहेत.
नुकतेच क्रेडाई पुणे मेट्रोच्या कॅम्प येथील कार्यालयातील रामकुमार राठी सभागृहात या अहवालाचे अनावरण करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता, क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापन समितीचे सदस्य पुनीत ओसवाल, डेटा अॅनालिस्ट राहुल अजमेरा, हिरेन परमार आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे १०० हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते.
या अहवालाबद्दल अधिक माहिती देताना रणजीत नाईकनवरे म्हणाले, “२०१९ च्या पहिल्या सहामाही सोबत तुलना केल्यास घरांची होत असलेली विक्री ही ३६% इतकी वाढली असून बांधकाम व्यवसाय क्षेत्रासाठी सकारात्मक बाब आहे. दुसरीकडे गृहखरेदीदार हे मोठ्या घरांना पसंती देत आहेत. २०२४ च्या पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या युनिट्सचे सरासरी मूल्य ७१ लाख रुपये आहे. २०२० च्या पहिल्या सहमाहीशी तुलना केल्यास हे प्रमाण ३९% ने वाढले असले तरी ही टक्केवारी इतर शहरांच्या तुलनेने पुणे शहर आजही परवडणारे शहर असल्याचे दर्शविते हे विशेष. या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांप्रमाणे याही वर्षी देशातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये व राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे आपले पहिले स्थान टिकवून आहे हे दुलर्क्षित करून चालणार नाही. आजही देशभरातील आणि राज्यातील नागरिक हे इतर मेट्रो शहरांपेक्षा नोकरी व राहण्यासाठी पुण्याला पसंती देत आहेत.” याबरोबरच नजीकच्या भविष्यात नवकल्पनांवर भर देण्यासोबतच शाश्वत विकास, व ग्राहकांचे समाधान यासाठी आम्ही वचनबद्ध असू असेही नाईकनवरे म्हणाले.
पुणे हाऊसिंग रिपोर्ट या अहवालासाठी लागणारी सर्व माहिती ही नोंदणी व मुद्रांक विभाग आणि रेराकडून उपलब्ध करून दिलेल्या माहितीमधून घेण्यात आली असल्याचे सांगत अभिषेक गुप्ता म्हणाले, “मुंबई – एमएमआर नंतर पुणे शहर हे देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून समोर येत आहे. घरांच्या विक्रीमध्ये पुणे शहर आपले स्थान टिकवून ठेवत असताना वेअर हाऊसिंग आणि कार्यालयीन जागांच्या विक्रीतही जागतिक पातळीवर महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येत आहे. राज्याच्या राजधानीचे शहर नसताना देखील पुणे हे सर्व बाजूंनी विकसित होत असलेले एकमेव शहर आहे. हैदराबाद, बंगळूरू, मुंबई ही प्रमुख शहरे देखील यामध्ये नाहीत. कार्यालयीन जागांचा विचार केल्यास पुढील एक वर्षात पुणे हे १०० मिलियन क्लबमध्ये लवकरच प्रवेश करेल. वेअर हाऊसिंग क्षेत्रात देखील पुणे देशात दुसऱ्या क्रमांकावर असून यामध्ये पुणे शहराने मुंबई, बंगळुरू या शहरांना देखील मागे टाकले आहे. नुकतीच मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुण्यामध्ये ५२० कोटी रुपये किंमत असलेली १६.४ एकर जागा खरेदी केली आहे, टेस्ला सारखी कंपनी पुण्यात येत आहे यामुळे नजीकच्या भविष्यात पुण्यामध्ये कार्यालयीन जागांची आवश्यकता असून यामुळे नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील आणि पर्यायाने घरांची मागणी आणखी वाढेल असे मला वाटते.”
क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मेट्रिक्स यांच्या वतीने पुणे हाऊसिंग रिपोर्ट – सप्टेंबर २०२४ सादर करण्यात आला. या अहवालातील महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे –
२०२४ च्या पहिल्या सहामाहीमध्ये पुणे पुन्हा एकदा घरांच्या विक्रीमध्ये देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून समोर आले असून २०२१ पासून सलग ३ वर्षे पुणे आपले हे आघाडीचे स्थान टिकवून आहे.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्यातील घरांच्या सरासरी किंमती या इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहेत आणि यामुळे पुणे हे देशातील राहण्यासाठी सर्वात परवडणारे मेट्रो शहर बनले आहे. यामुळे शहराकडे केवळ उद्योगच नव्हे तर स्थलांतरित देखील आकर्षित होत आहे.
२०२४ च्या पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही ७१ लाख रुपये इतकी आहे. असे असले तरी आजही पुणे शहर हे देशातील परवडणाऱ्या शहरांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे हे लक्षात घ्यायला हवे.
२०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांत पुण्याने ३१ हजार कोटी मूल्याच्या जवळपास ४४ हजार घरांची विक्री केली आहे.
पुण्याच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राने गेल्या ५ वर्षांमध्ये युनिट विक्रीच्या एकूण मूल्यामध्ये तब्बल १६% इतका लक्षणीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) अनुभवला आहे.
२०२० शी तुलना केल्यास गृहखरेदीदार हे याहीवर्षी आकाराने मोठी घरे खरेदी करण्यास इच्छुक आहेत.
पुणे शहराचा उत्तर पश्चिम भाग असलेला बाणेर- महाळुंगे, पाषाण -सुस व हिंजवडी – वाकड – ताथवडे या भागातील विक्री ही एकूण विक्रीच्या तब्बल ६०% इतकी आहे.
याबरोबरच पुणे – दक्षिण पश्चिम (आंबेगाव – वारजे – कोथरूड- बावधन) भागामध्ये २०२० व २०२४ च्या पहिल्या सहामाही या काळातील विक्रीची तुलना केली असता विक्री केलेल्या घरांच्या सरासरी मूल्यामध्ये ४४% इतकी लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
मागील ५ वर्षांत (२०१९- २०२४) पुणे शहरात रोजगारामध्ये तब्बल ८% इतकी वाढ झाली असून शहरात असलेले रोजगारांपैकी ३८% नागरिक हे ए व ए प्लस श्रेणीमधील कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. शहरात नजीकच्या भविष्यात रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता असल्याने वेअर हाऊस आणि कार्यालयीन जागांची आवश्यकता भासणार असून त्या दृष्टीने देखील बांधकाम व्यवसाय क्षेत्राने विचार करायला हवा आहे.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान