September 14, 2024

पुणे: दहशतवाद्यांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे वर्ग होणार, एटीएसकडून तपास सोपविण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, दि. ७/०८/२०२३: कोथरुडमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचे लागेबांधे ‘ इसिस’ दहशतवादी संघटनेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार याप्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला जाणार आहे. एनआयएकडे तपास सोपविण्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली असून प्रक्रिया मंगळवारपर्यंत (८ ऑगस्ट) पूर्ण होणार असल्याची माहिती दहशतावाद विरोधी पथकातील अधिकार्‍यांनी दिली.

महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३ दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी १८ जुलैला अटक केली होती. याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कोंढवा भागात याकूब साकी आणि इम्रान खान यांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा. कोंढवा) आणि त्यांना आर्थिक रसद पुरविणारा खासगी कंपनीतील अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, मूळ रा. रत्नागिरी) यांना अटक केली होती.

‘इसिस’च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळय़ात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रीय होता. याप्रकरणी एनआयएच्या पथकाने झुल्फीकार बडोदावाला याच्यासह पुण्यातील डॉ. अदनाल अली सरकार यांच्यासह चौघांना अटक केली होती. कोथरुड भागात दुचाकी चोरताना अटक केलेल्या दहशतवाद्यांशी डॉ. सरकारचे संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. एनआयएने ‘आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.

त्यांचे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचे उघडकीस आल्यानंतर एटीएसने बडोदावाला याला ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते. बडोदावाला याने साकी आणि खान यांना पुण्यात आणून बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. बडोदावालाच्या सांगण्यावरून अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याने साकी आणि खान यांना कोंढव्यात राहण्यासाठी खोली मिळवून दिली होती.