October 3, 2024

‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

पुणे, दि. २३ सप्टेंबर, २०२४ : जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाच्या वतीने नुकतेच ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालय येथून सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेस आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. या मॅरेथॅान स्पर्धेसाठी शिरोळे यांनी आपल्या आमदार निेधीतून १० लाख रूपये दिले आहेत.

पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, दिनेश काळे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ अंतर्गत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ सुहास दिवसे यांनी सांगितले.

डॉ. दिवसे पुढे म्हणाले, “ आज ३५० वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आपणा सर्वांना स्फूर्ती आणि प्रेरणा देत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात त्यांचा ठसा उमटलेला आहे. युनोस्कोने राज्यातील ११ किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड हे तीन किल्ले आहेत. हे सर्व गड किल्ले आपणास वारसा नामंकनात आणायचे आहेत.”

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे आहेत. त्यांची ओळख जगाला व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. किल्ल्यांचे महत्त्व, गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सांस्कृतिक वारसा आपण कसा जपत आहोत हे युनोस्को समोर आपल्याला प्रदर्शित करायचे आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीनही किल्ल्यांचे जीएसआय कोड द्वारे मॅपिंग स्टोरी तयार केली आहे अशी माहितीही डॉ दिवसे यांनी दिली.

आमदार शिरोळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील ११ गड किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत याचा मनापासून आनंद आहे. पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.”

स्पर्धेसोबतच यावेळी दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.