पुणे, ३/८/२०२४: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती बप्पा असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची श्री गणेश अभिषेक सेवा यंदापासून सुरु होणार आहे. भाविकांना ऐच्छिक देणगीच्या माध्यमातून ही सेवा मिळणार असून त्यासाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. गेल्या १३३ वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, उत्सवात श्री गणेशाची अभिषेक सेवा अद्यापपर्यंत सुरु करण्यात आली नव्हती. मात्र, गेल्या दोन तीन वर्षापासून भाविकांकडून अभिषेक सेवा सुरु करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात सुरु होती. भाविकांच्या या मागणीचा मान राखत अखेर ट्रस्टने यावर्षीपासून अभिषेक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले. त्यानुसार दहा दिवसांच्या उत्सव कालावधीत सकाळी ६ ते स. ११ या वेळेत भाविकांना बाप्पाचा अभिषेक करता येणार आहे. त्यासाठी आधीच नाव नोंदणी करुन वेळ निश्चित करता येणार आहे. त्यासाठी ९११२२२१८९२ या संपर्क क्रमांकावर अथवा http://bit.ly/abhisheksbtrgt या संकेत स्थळावर नाव नोंदणी करता येणार आहे. याशिवाय नाव नोंदणी करू न शकलेल्या भाविकांना थेट उत्सव मंडपात नाव नोंदणी केलेल्या भाविकानंतर उपलब्ध वेळेनुसार अभिषेक करता येईल. महत्त्वाचे म्हणजे या श्री. गणेश अभिषेकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून भाविकांना ऐच्छिक देणगी देऊन अभिषेक करता येणार आहे. केवळ पंजामृत आणि पेढ्यांचा प्रसाद भाविकानी सोबत आणावे लागणार आहे. सोबत दिलेल्या संपर्क क्रमांकावर अथवा संकेत स्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु करावी अशी आग्रही मागणी असंख्य गणेश भक्तांकडून होत होती. त्यानुसार ही सेवा सुरु करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. भाविकांनी ऐच्छिक देणगी देऊन या सेवेचा लाभ घ्यावा, ही विनंती.’’- पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान