October 5, 2024

भव्य मिरवणुकीद्वारे विद्यार्थ्यांचे मुहंमद पैगंबर यांना अभिवादन!

पुणे, २०/०९/२०२४: महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थांच्या वतीने हजरत मुहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त विद्यार्थ्यांची अभिवादन मिरवणूक आज २० सप्टेंबर रोजी सकाळी भव्य स्वरूपात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ. पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटी’चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.

मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांनी हजरत मुहम्मद पैगंबरांच्या शिक्षण, सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश असलेले फलक हातात घेतले होते. या मिरवणुकीने पुण्याच्या प्रमुख भागांतून प्रवास करत शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकतेचे संदेश दिले. संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख, एस.ए.इनामदार,साबीर शेख,मशकूर शेख,आसिफ शेख,अफझल खान,वहाब शेख, बबलू सय्यद,शाहीद शेख आणि अन्य पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

ही मिरवणूक आझम कॅम्पस येथून सुरू होऊन डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट,ट्राय लक हॉटेल,कोहिनुर हॉटेल,बाटा चौक,सरबतवाला चौक,क्वार्टर गेट,पद्मजी पोलीस चौकी,निशात थिएटर,भगवानदास चाळ,चुडामण तालीम,पूना कॉलेज मार्गे पुन्हा आझम कॅम्पस येथे समाप्त झाली.हे अभिवादन मिरवणुकीचे २० वे वर्ष असून, दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे महामानव छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हजरत मुहम्मद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारच्या मिरवणुका काढल्या जातात. यामधून महामानवांचे सामाजिक आणि शैक्षणिक संदेश जनतेपर्यंत पोहोचवले जातात.