June 22, 2025

अभय भुतडा फाऊंडेशनतर्फे शिवसृष्टीला ५१ लाखांची देणगी

पुणे, दि. १३ मे, २०२५ : आशियातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने ५१ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. अभय भुतडा यांच्या इच्छेप्रमाणे या देणगीचा वापर हा जास्तीत जास्त शिवप्रेमींना शिवचरित्र आणि छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास माहिती व्हावा, या दृष्टीने करण्यासाठी येत्या गुरुवार दि. १५ मे पासून ते १५ जुलै या मर्यादित कालावधी पर्यंत शिवसृष्टीस भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला नाममात्र ५० रुपये इतकेच प्रवेशशुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी कळविली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी शिवसृष्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन देखील कदम यांनी केले.

या विषयी अधिक माहिती देताना जगदीश कदम म्हणाले, “कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचे दोन टप्पे आता पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. या कामाला अनेकांचा हातभार लागत असून नुकतीच बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक अभय भुतडा यांनी आपल्या अभय भुतडा फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवसृष्टी प्रकल्पाला रुपये ५१ लाखांची देणगी दिली आहे. अभय भुतडा यांनी केलेल्या या मदतीचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. या देणगीचा वापर हा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शिवचरित्र पोहोचावे यासाठी व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. हेच लक्षात घेत येत्या १५ मे ते १५ जुलै या मर्यादित कालावधी दरम्यान शिवसृष्टीला भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला नाममात्र ५० रुपये इतके प्रवेशशुल्क आकारण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला आहे.”

सध्या शिवसृष्टी पाहण्यासाठी असलेल्या तिकीटाची किंमत ही प्रौढांसाठी प्रत्येकी रु. ६०० तर १६ वर्षांखालील मुलांसाठी प्रत्येकी रु. ३०० इतकी आहे. अभय भुतडा यांनी दिलेल्या देणगीमुळे ही तिकीटाची किंमत यंदाच्या मोसमात कमी करण्यात आली असून आता मर्यादित कालावधीसाठी नाममात्र ५० रुपयांमध्ये प्रत्येक शिवप्रेमीला शिवसृष्टी अनुभविता येईल, असेही कदम
म्हणाले.

महाराजांचा इतिहास, त्यांचा संघर्ष, त्यांनी पाहिलेली स्वराज्याची स्वप्ने, त्यांची राज्यपद्धती, यांची दूरदृष्टी यांबद्दल येणाऱ्या पिढ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म या विचारांचा प्रचार व प्रसार सर्वत्र झाला पाहिजे या प्रामाणिक हेतूने पुण्याजवळील आंबेगाव, ब्रुद्रुक, पुणे ४११ ०४६ येथे तब्बल २१ एकर परिसरात उभारलेली शिवसृष्टी यानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल असा आम्हाला विश्वास आहे. सध्या सुरु असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये यानिमित्ताने आपापल्या कुटुंबातील लहाने मुले व तरुणांना नागरिक शिवसृष्टी दाखविण्यास घेऊन येतील. आपल्या द्रष्ट्या व जाणता राजाचे व्यक्तिमत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवता येईल, आपल्या इतिहासासोबतच नीतीमूल्ये आणि कर्तव्यांची जाणीव नव्या पिढीला होऊन एक सशक्त समाज तयार होण्यासाठी मदत होईल, असा आशावादही यावेळी कदम यांनी व्यक्त केला.

शिवसृष्टीचा बहुतांश भाग हा वातानुकुलित यंत्रणेने सज्ज असल्याने आरामदायी वातावरणात शिवचरित्राची अनुभूती शिवप्रेमींना घेता येईल. त्यामुळे, पुणेकर व महाराष्ट्रातील इतर शहरांतील शिवप्रेमी नागरिकांनी आवर्जून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नुकतेच फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीचे औचित्य साधत शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या टप्प्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे विशेष असे टाईम मशीन थिएटर. हे थिएटर शिवप्रेमींसाठी एक पर्वणी ठरत असून यामधील कालकुपीत बसून आपण सुमारे काही हजार वर्षे मागे जातो व तेथून शिवाजी महाराजांचा काळ दृक श्राव्य पद्धतीने अनुभवितो. यामध्ये महाराजांशी संबंधित कथा या आधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यमातून शिवप्रेमींना अनुभवता येतात. यासाठी मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर यांचा प्रामुख्याने अनुभव घेता येणार असून या कालकुपीच्या थिएटरमध्ये एका वेळी १०० व्यक्ती विशेष अशा ३६ मिनिटांच्या शोचा अनुभव घेऊ शकतात.

याशिवाय शिवसृष्टीमधील दुर्गवैभव’, ‘रणांगण’ ही दालने, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे ‘श्रीमंत योगी’ हे दालन, राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन, महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या महाराजांच्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्स, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या लढायांची माहिती देणारे दालन, प्रतापगडावर असलेल्या तुळजा भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती आणि गंगासागर तलाव आदींना भेट देत शिवकाळाचा प्रत्यक्ष अनुभवच शिवप्रेमींना घेता येणार आहे.